Tuesday 8 March 2016

Khimat- खिमट

खिमट

सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो, एक छोटा तान्हा जीव आपल्यात आलेला असतो… हळू हळू मोठा होतो आणि अंगावरच्या दुधाशिवाय बाहेरचे खाणे त्याला घालायची वेळ येते …  त्यावेळी त्याला काय घालावे यावर घरात चर्चा सत्रे रंगतात. मी हे पदार्थ सांगते आहे ते काही फार वेगळे नवीन असे नाहीच आहेत … माझी मुलगी आता थोडी मोठी झाली आहे तिला खाऊ करून घालण्याचा हा अनुभव आहे फक्त … बर्याचदा बाळाला बेबी फूड जास्त घातले जाते , त्यामुळे बाळ गुटगुटीत दिसते पण ते इतके हेल्दी नसते …त्यापेक्षा आपण घरात केलेला खाऊ हा बाळासाठी जास्त चांगला , स्वच्छ  आणि मायेने बनवलेला असतो आणि हे करणे काही फार कठीण नाही… अगदी नोकरी करणाऱ्या स्रिया देखील थोडी तोशीश हे करू शकतात . साधारणपणे बाल सहा महिन्याचे झाल्यावर त्याला बाहेरचे खाऊ देतात, पण कधीकधी ४-५ महिन्यापासूनच एक -दोन चमचे तांदूळ शिजवाताना चे पाणी , डाळीचे पाणी,  साबुदाण्याचे पीठ शिजऊन पातळ करून घालायला हरकत नाही, हे जास्तीत जास्त २ चमचे घालावे. बाळ खातंय म्हणून खूप घालू नये,  आता नमनाला घडाभर ओतून कृतीला सुरुवात करूया

साहित्य :

१. आंबेमोहर तांदूळ १ वाटी ( दुसरा तांदूळ घेऊ शकता पण याला छान वास असतो बासमतीने काहीवेळा बाळाला गेंस त्रास होऊ शकतो
२. मुग डाळ १/२ वाटी
३. जिरे ३/४ छोटा चमचा

कृती :

तांदूळ व डाळ स्वच्छ धुऊन २ तास भिजत ठेवावेत, आणि सुती कापडावर पसरून सावलीत वाळवून घ्यावेत कढईत जिरे व डाळ तांदूळ  छान लालसर होईतो परतावेत
गार झाल्यावर मिक्सर वरून याचा बारीक रवा  ठेवावा
कोरड्या केलेल्या डब्यात भरून ठेवावा हा रवा गरजेप्रमाणे वापरता येतो

बाळाला खाऊ घालायच्या वेळी छोट्या पातेल्यात एक चमचा तूप घालून त्यात थोडी हिंगाची चिमट घालावी आणि हा रवा जरा परतावा , अगदी गरम होण्याइतपतच. पाणी घालून मऊ शिजवावे त्यात चवीप्रमाणे मीठ घालावे आणि बाळ रवाळ पदार्थ खाण्यासाठी जर लहान असेल तर स्टीलच्या गाळण्यातून गाळून घ्यावे किंवा एकदा मिक्सर करावे , गाळलेल्याची चव जास्त छान लागते

सहा महिन्याच्या  बाळाला साधारणपणे २ चमचे रव्याचा एक वाटी केलेला खाऊ एक वेळेस पुरतो

Friday 26 February 2016

चकोल्या -Chakolya

काहीजण याला वरणफळ म्हणतात, चिकोल्या,  चकोल्या असेही म्हणतात.  एकदम पोटभरीचे आहे. आम्ही संध्याकाळी हा एक पदार्थ केला की काही दुसरे करत नाही. पटापट साहित्य आणि क्रुती लिहुन घ्या.

साहित्य :-
शिजवलेली तूर डाळ २-३ वाटी
कणिक ३ चपात्यासाठीची
मीठ चवीनुसार
तिखट चवीनुसार
ओवा २ चिमट
मेथीदाणे १/४ चमचा
मोहरी 
हळद
कढीपत्ता
लसुण ८-१० पाकळ्या
कोथिंबीर
गोडा मसाला
गुळ
तेल

क्रुती:-
१) कणिकेत थोडे तेल घालुन मीठ, तिखट, ओवा, चिमुटभर हळद घालुन जरा घट्टसर मळुन घ्यावे. 

२) कढईत फोडणीसाठी तेल तापवायला ठेऊन त्यात मेथी दाणे, मोहरी, हळद, कढीपत्ता, लसुण घालावा. त्यात शिजवलेली डाळ घालावी. 

३) ऊकळी फुटल्यावर त्यात चवीनुसार तिखट, मीठ, एक छोटा खडा गुळ, एक चमचा गोडा मसाला, २ आमसुले घालुन शिजवत ठेवावे. 

४) मळलेल्या तिखटमीठाच्या कणकेचा गोळा घेऊन तो मोठा पोळपाटभर लाटावा. शंकरपाळ्यांच्या चक्रीने छोटेछोटे चौकोनी तुकडे करावेत. हे तुकडे उकळत्या वरणात घालावे व शिजऊन घ्यावेत. 

५) खाताना गरम गरम चकोल्यांवर कोथिंबीर व तुप घालुन खावे. 

Wednesday 24 February 2016

ठुमरा भात - thumara rice

         ही माझ्या सासुबाईंच्या आईंची पाकक्रुती आहे, खुप सोपी आणि चविष्ट. शिळा भात असेल तर अजुनच छान लागतो… त्यामुळे dont worry about leftovers …. अगदी घरी असलेल्या साहित्यात होतो .

साहित्य :-
गार भात ३-४ वाट्या
लसूण ७-८ पाकळ्या
ताजे दही १ वाटी
दुध
मीठ
तळणीची मिरची
आवडत असल्यास फोडणी

कृती :-

भात मोकळा करून घेणे , त्यात लसुण चेचुन, दही कालवऊन घ्यावा. गरजेप्रमाणे मीठ व दुध घालुन एकत्र करा व तास दिड तास झाकुन ठेवा.

खायच्या वेळी परत जरा कालऊन, लागल्यास दुध घालुन घ्या. वरून तळणीची मिरची व फोडणी घालुन मटकवा…

भातात लसुण कच्चाच घालायचा आहे.

माझ्या सुखाच्या व्याख्येत या भाताचा वरचा नंबर आहे.

माझ्या घरात हा भात २ जणांना पुरतो

Sunday 30 August 2015

मुग डाळीची भजी - Moong dal Pakoda

मुग डाळीची भजी

खूप छान चव येते या भजीची, आता मस्त पावसाळा आहे ( अर्थात या वर्षी हे आठवावे लागत असले तरीही ) यात कायम कांदा भजीची फर्माईश असतानाहि बदल म्हणून हि रेसिपी करून पहा नक्कीच आवडेल

साहित्य :

१ भांडे मुग डाळ ( ४-५ तास भिजवून )
४ चमचे रवा
१ मोठा कांदा
आले लसुन पेस्ट
तिखट
मीठ
चिमुटभर खाण्याचा सोडा
टाळण्यासाठी तेल

कृती :-

१. भिजवलेली मुग डाळ मिक्सरमधून  घ्यावी, त्यात ४ चमचे रवा नीट मिक्स करून १ तास झाकून ठेऊन द्यावे.

२. कढईत तेल गरम करावे, अगदी तळायच्या वेळी यात कांदा बारीक कापून, १ चमचा आले लसुन पेस्ट,चवीनुसार तिखट मीठ घालावे. त्यात १/४ चमचा (छोटा ) सोडा घालून मिस्क करावे, तेलात डीप फ्राय करावेत.

टीप : कांद्या बरोबर कोबी, फ्लॉवर, बिन्स, गाजर, इत्यादी भाज्या घालू शकतो. 

Wednesday 1 July 2015

Ambadi chi Bhaji - अंबाडीची भाजी

अंबाडीची भाजी

हि भाजी खूप चविष्ट असते, भाकरीबरोबर फारच छान लागते, कृती पण सोपीच आहे 

साहित्य :
अंबाडी १ पेंडी (निवडून )
१ मुठ तूर डाळ 
१ मुठ तांदूळ 
१ मुठ शेंगदाणे (२-३ तास भिजवलेले )
तेल 
फोडणीचे साहित्य 
१२-१४ लसूण पाकळ्या  
१ कांदा चिरून 
मिरची 
मीठ  


कृती :
१. अंबाडीची  पाने  नीट निवडून, धुवून, ५-७ मिनिटे शिजवून घ्यावी, नंतर घट्ट पिळून काढावी, हा रस खूप आंबट असतो 

२. एका पातेल्यात तूर डाळ , तांदूळ, शेंगदाणे शिजवावेत खूप शिजवू नयेत, अर्धे कच्चेच ठेवावेत. 

३. कढाईत तेल नेहमीपेक्षा थोडे जास्त घेऊन त्यावर हळद आणि हिंग घालावे, मिरची, भरपूर लसुण घालून परतावे, मग कांदा घालून परतावा. अर्धवट शिजलेले दल तांदूळ व दाणे घालून त्यात अंबाडीची पिळलेली भाजी घालावी. 

४. निट मिक्स करून त्यावर मीठ घालावे,  लागल्यास पाणी घालावे. हि भाजी थोडीशी पातळसर करतात अगदी सुक्की नाही. व्यवस्थित शिजवून घ्यावी 


टीप : खाताना पुन्हा भाजीवरून लसुणाची फोडणी घालून खातात, 
         हि भाजी आंबट असली तरी यात गुळ घालत नाहीत
          हि भाजी भाकरी, दही , कांदा , ठेचा सोबत खावी अतिशय उत्कृष्ठ लागते   

Sunday 14 June 2015

Corn Rice - स्वीट कॉर्न पुलाव

Corn Rice - स्वीट कॉर्न पुलाव 

अगदी नैवेद्याला हि चालणारी… मस्त आणि नेहमीच्या मसालेभाताला छान पर्याय आहे हि रेसिपी …. यात आवडी प्रमाणे भाज्या घालू शकता पण दिलेल्या भाज्या सर्वात छान लागतात … 

साहित्य :

२ वाट्या तांदूळ 
सोललेले स्वीट कॉर्न पाऊण वाटी 
१ लहान सिमला मिरची 
१ टोमाटो 
१ मध्यम आकाराचा बटाटा 
तेल 
पुलाव किंवा बिर्याणी मसाला किंवा आवडत असेल तर खडा मसाला 
फोडणीचे साहित्य 
मीठ 
तिखट 
पाणी 

कृती :

१. तांदूळ धुवून १ तासासाठी भिजवावेत,  पाणी काढून , त्यात १ चमचा पुलाव मसाला, गरजेप्रमाणे मीठ, तिखट घालून मिक्स करून ठेवावे. 

२.  टोमाटो व सिमला मिरची  धुवून लांबट आकारात कापून घ्याव्यात , बटाटा साल काढून लांबट आकारात कापावेत फार बारीक कापू नये 

३. पातेल्यात किंवा कुकर मध्ये तेल गरम करून त्यात थोडे जिरे , हळद, हिंग घालावी, त्यावर चिरलेल्या भाज्या घालाव्यात व थोड्या परताव्यात. त्यावर भिजवलेले  तांदूळ घालावेत आणि नीट परतावे. 

४. तांदुळाच्या दुप्पट पाणी घालावे व कुकरचे झाकण लावून २-३ शिट्या काढाव्यात , पातेल्यात असल्यास अर्धवट झाकण ठेऊन लक्ष द्यावे म्हणजे कढ उतू जाणार नाही. हे मिश्रण सारखे हलवू नये तांदुळाची शिते तुटतात. गरज लागल्यास काटा चमच्याने हलवावे. 

५. शिजल्यावर गरम गरम सर्व्ह करावा त्यावर कोथिम्बिर आणि खोबरे घालून….  

Saturday 13 June 2015

अळिवाचे / हळिवाचे लाडु

खरतर या लाडवाची कृती पोस्टायला वेळ झाला … उन्हाळा आला आता पण तरीही आता वेळ आहे थोडा म्हणून आत्ता देती आहे … कृपया गोड मानून घ्या… 

साहित्य :-
१/३ वाटी स्वच्छ निवडलेले अळीव 
एक नारळ खोवलेला
दिड वाटी गुळ
२ चमचे तूप 
५-६ भिजउन साल काढलेले बदाम
आवडत असल्यास वेलची पावडर

कृती :-
अळीव स्वच्छ निवडुन घ्यावेत. त्यामधे बारिक खर असते. 
खाताना तोंडात आली तर लाडु खावासा वाटत नाही. 

१) नारळ पाण्यामध्ये अळिव किमान २ तास भिजउन ठेवावेत, जर पुरेसे नारळ पाणी नसेल तर साद्या पाण्यात किंवा दुधात भिजवावेत. 

२) अळीव नीट भिजल्यावर एका कढईत २ चमचे तुप वितळउन त्यावर चिरलेला गुळ  दिड वाटी घालावा. सतत हलवत रहावे.

३) गुळाला बुडबुडे आल्यावर एक खोवलेला ओला नारळ घालावा. खोबर्याची पाठ येऊ देऊ नये.  चांगले परतुन घ्यावे. 

४) आता त्यात भिजवलेले अळीव घालावे. बदामाचे तुकडे घालावे. अळीव ओले असल्यामुळे हे मिश्रण पातळ होईल. सतत हलवत रहावे.आच बारीकच ठेवावी. जवळ जवळ अर्ध्या तासात हळुहळु हे मिश्रण आळुन येईल. शिर्यापेक्षा थोडे आळले की बंद करावे. गार झाल्यावर लाडु वळावेत. 

 हे लाडु थोडे मऊसरच होतात. 
दिलेल्या साहित्यात १० लाडु होतील. 
४-५ दिवस शीतकपाटाबाहेर राहतात… 
बाळंतिणीला उत्तम आहेत, दुध वाढायला मदत होते. 
प्रकृतीने उष्ण आहेत .