Monday 23 March 2015

Solkadhi - सोलकढी

थंडगार सोलकढी

साहित्य :

१ ओला नारळ खोवलेला
४-५
चांगली रसरशीत आमसुले किंवा अर्धी वाटी कोकम आगळ
४ पाकळ्या लसूण
आले छोटा तुकडा
१ मिरची
मीठ चवीनुसार
कोथिम्बिर बारीक चिरून
५०० ml  गार पाणी

कृती :
१.  नारळाच्या खिसात पाणी  घालून मिक्सरमधून  फिरऊन घ्यावे आणि स्टीलच्या गाळण्यातून  नारळाचे दुध गाळून घ्यावे , गाळण्यावर दाब देऊन नीट सगळा रस काढावा.
२.  परत नारळाचा खीस मिक्सरमध्ये घालून त्यात आमसुले, लसूण, आले, मिरची, हे सारे फिरवावे  परत गाळून घ्यावे. हीच क्रिया त्याच नारळाच्या खिसावर २-३ वेळा करावी पण नारळाचे दुध फार पाणचट करू नये.
आगळ घातल्यास ते मिक्सरवरून फिरवले नाही तरी चालते ( आमसुले आवडीनुसार आणि आंबटपणानुसार कमी जास्त केली तरी चालतात , आगळ घालताना थोडे थोडे घालावे, अधून मधून चव घेऊन पाहावे म्हणजे खूप आंबट होणार नाही )
३. अमसुलामुळे नारळाच्या  दुधाला थोडासा गुलाबीसर येतो, त्यात चवीनुसार मीठ घालावे आणि वरून बारीक चिरलेली कोथिम्बिर भुरभुरावी
४. आवडत असल्यास वरून जीऱ्याची फोडणी घालावी (नुसतेहि छान लागते)

थंड करून प्यावी अथवा जेवताना घ्यावी.


Saturday 14 March 2015

Puranpoli - पुरणपोळी

पुरणाच्या पोळ्या

लागणारा वेळ : १. ५ तास
पुरणपोळी 

साहित्य:

१ वाटी हरभरा डाळ (२-३ तास पाण्यात भिजवलेली)
१ वाटी गुळ
१ चमचा भाजलेल्या बडीशेपेची भरड
१ चमचा छोटा वेलची पावडर
२ वाटी  गव्हाचे पीठ
१ वाटी तांदळाचे पीठ ( असल्यास)
३ चमचे तेल
चवीनुसार मीठ
मळण्यासाठी पाणी
साजूक तूप

कृती :

१. हरभरा डाळ कुकरला लावून ४-५ शिट्या काढून घ्याव्यात , डाळ पूर्ण मऊ शिजली पाहिजे .

२. कुकर गार होईपर्यंत कणिकेत थोडे मीठ आणि तेल घालून मळावे, कणिकेला चांगले १५-२० मिनिटे पाण्याचा हात लाऊन मळत राहावे. मध्ये मध्ये कणकेचा थोडा तुकडा हातात घेऊन तो दोन बाजूने ओढून पाहावा, तो व्यवस्थित लांब होत असेल व लगेच तुटत नसेल तर कणिक मळून झाली असे समजावे. त्यावर तेलाचा हात फिरऊन गोळा  झाकून ठेवावा.

३. कुकर मधील डाळीतील पाणी आणि थोडी शिजलेली डाळ बाजूला काढावी, याची कटाची आमटी करतात
जर आमटी नको असेल तर फक्त पाणी काढावे. यामध्ये गुळ घालून परत शिजवायला ठेवावे, हे पुरण सतत हलवत राहावे नाहीतर तळाला लागते. पुरण तयार होत आले कि ते भांड्याच्या कडा सोडून गोळा होईन येऊ लागते, आणि हाताला हलवण्यास जड येते. पुरण घट्टसर करून घ्यावे.

४. खाली उतरउन त्यात वेलची पावडर आणि बडीशेपेची भरड घालावी, आणि गरमच पुरणयंत्रावरून   फिरवून घ्यावे , जर पुरण यंत्र नसेल तर हल्ली जाळ्या मिळतात त्यावरून जरी गाळून घेतले तरी चालेल

५. पुरण गार झाले कि त्याचे गोळे करून घ्यावेत, तवा तापत ठेवावा, उलथने जवळ ठेवावे. आता मळलेल्या कणीकेचा  पुरणाच्या गोळ्याच्या निम्मा किंवा थोडा कमीच गोळा घ्यावा , त्याला हातावर खोलगट आकार देऊन त्यात पुरणाचा गोळा ठेवावा, आणि कणिकेचे तोंड हळूहळू मिटुन घ्यावे ( हे काम अतिशय काळजीपूर्वक करावे) तयार गोळा हळू हळू चपटा करून तांदळाच्या पिठात घोळऊन पोळपाटावर अगदी हलक्या हाताने लाटावा. लाटताना पोळीच्या कडे पर्यंत पुरण जाईल याची काळजी घ्यावी.

६. तयार पोळी हळुवार हाताने तव्यावर टाकावी ( अवघड वाटत असल्यास एका पुरेशा मोठ्या कागदाचा तुकडा प्रथम पोळीवर झाकावा नंतर पोळपाट उचलून पोळी कागदावर घेऊन मग तव्यावर टाकावी.

७. मध्यम आचेवर पोळी दोन्ही बाजूने नीट खरपूस भाजून घ्यावी , परताना पोळी मोडणार नाही याची काळजी घावी.

८. तव्यावरून काढून गरम गरम असताना तुपाची धार सोडून खावे.

या साहित्यात ८-१० पोळ्या होतील.   

Thursday 12 March 2015

Bhadang - कोल्हापुरी भडंग

कोल्हापुरी भडंग 

साहित्य:
५०० ग्राम कोल्हापुरी चिरमुरे/ कुरमुरे
१ वाटी शेंगदाणे
१०-१२ कुड्या सोलून
१५-२० कढीपत्ताची पाने
१ चमचा तिखट
१-२ चमचा मेतकुट
१ चमचा पिठीसाखर
चवीनुसार मीठ
१/२ वाटी तेल
तेल  फोडणीसाठी
मोहरी गरजेनुसार
हळद गरजेनुसार

वेळ : १० मिनिटे

कृती :
१. चिरमुरे एका मोठ्या परातीत अथवा डब्यात काढावेत, कुरकुरीत असल्याची खात्री करून घ्यावी जर मऊ पडले असतील कढईत किंवा ओव्हन मध्ये गरम करावेत.
२. एका छोट्या ताटलीमध्ये १/२ वाटी तेल त्यात मेतकुट, मीठ, तिखट, पिठीसाखर सगळे मिसळून घ्यावे, ते सर्व चिरमुरयांना व्यवस्थित लावून घ्यावे.
३. छोट्या कढईत पुरेसे तेल गरम करून त्यात प्रथम शेंगदाणे घालावेत, छान सोनेरी रंग आल्यावर मोहरी, हळद, चिरलेल्या लसूणाच्या कुड्या आणि कढीपत्ताची पाने घालावीत.
४. हि फोडणी गरमच मसाला लावलेल्या चिरमुरयांन्वर घालावी आणि परत सगळे व्यवस्थित मिक्स करावे.

खमंग कुरकुरीत भडंग तयार

* हि भडंग भेळ करताना वापरली तर भेळ खूप छान लागते 

Healthy Khajur Barfi - खजुराच्या वड्या

खजुराच्या वड्या

लागणारा वेळ : ४५ मिनिट 

साहित्य :
५०० ग्राम  काळे खजूर 
८-१०  सुके अंजीर 
१/२ वाटी काजूचे तुकडे 
१/२ वाटी बदामाचे तुकडे  
१/४ वाटी  खसखस 
२ चमचे साजूक तूप 


कृती :
१. खजुराच्या बिया काढून त्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत , सुके अंजीराचेही बारीक काप करावेत 
२. कढईत खसखस भाजून बाजूला काढून घ्यावी. 
३. त्याच कढईत १ चमचा तूप गरम करून त्यावर काजू व बदामाचे तुकडे भाजून घ्यावेत आणि एका ताटात काढावेत. 
४. त्याच तुपावर  खजूर आणि अंजीर घालून नीट परतावे, १० मिनिटात ते मऊ होईल. गेस वरून खाली काढून  हे मिश्रण गरम असतानाच मिक्सर वरून फिरून घ्यावे.  
५. परत कढईत १ चमचा तूप गरम करून त्यावर खजुराचा मिश्रणाचा गोल आणि काजू आणि बदामाचे काप घालून ३-४ मिनिट परतावे , सर्व नीट मिक्स करून घ्यावे. 
६. पोळपाट लाटण्यावर तुपाचा हात फिरून त्यावर हा मिश्रणाचा गोळा लाटुन वड्या  पाडाव्यात 
७. या वड्या एका ताटात काढून १० मिनिटे फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवाव्यात.  

गार झाल्यावर या वड्या खाण्यास तयार आहेत.  
या वद्य १० ते १५ दिवस  नीट टिकतात.  

* यात हवे असल्यास सर्व प्रकारचा सुका मेवा घालू शकता.  
* चांदीच्या वर्खाने सजवल्यास खूप छान दिसते आणि खास लहान  मुलांसाठी केल्या तर ते खूप आवडीने खातात.