Sunday 30 August 2015

मुग डाळीची भजी - Moong dal Pakoda

मुग डाळीची भजी

खूप छान चव येते या भजीची, आता मस्त पावसाळा आहे ( अर्थात या वर्षी हे आठवावे लागत असले तरीही ) यात कायम कांदा भजीची फर्माईश असतानाहि बदल म्हणून हि रेसिपी करून पहा नक्कीच आवडेल

साहित्य :

१ भांडे मुग डाळ ( ४-५ तास भिजवून )
४ चमचे रवा
१ मोठा कांदा
आले लसुन पेस्ट
तिखट
मीठ
चिमुटभर खाण्याचा सोडा
टाळण्यासाठी तेल

कृती :-

१. भिजवलेली मुग डाळ मिक्सरमधून  घ्यावी, त्यात ४ चमचे रवा नीट मिक्स करून १ तास झाकून ठेऊन द्यावे.

२. कढईत तेल गरम करावे, अगदी तळायच्या वेळी यात कांदा बारीक कापून, १ चमचा आले लसुन पेस्ट,चवीनुसार तिखट मीठ घालावे. त्यात १/४ चमचा (छोटा ) सोडा घालून मिस्क करावे, तेलात डीप फ्राय करावेत.

टीप : कांद्या बरोबर कोबी, फ्लॉवर, बिन्स, गाजर, इत्यादी भाज्या घालू शकतो. 

Wednesday 1 July 2015

Ambadi chi Bhaji - अंबाडीची भाजी

अंबाडीची भाजी

हि भाजी खूप चविष्ट असते, भाकरीबरोबर फारच छान लागते, कृती पण सोपीच आहे 

साहित्य :
अंबाडी १ पेंडी (निवडून )
१ मुठ तूर डाळ 
१ मुठ तांदूळ 
१ मुठ शेंगदाणे (२-३ तास भिजवलेले )
तेल 
फोडणीचे साहित्य 
१२-१४ लसूण पाकळ्या  
१ कांदा चिरून 
मिरची 
मीठ  


कृती :
१. अंबाडीची  पाने  नीट निवडून, धुवून, ५-७ मिनिटे शिजवून घ्यावी, नंतर घट्ट पिळून काढावी, हा रस खूप आंबट असतो 

२. एका पातेल्यात तूर डाळ , तांदूळ, शेंगदाणे शिजवावेत खूप शिजवू नयेत, अर्धे कच्चेच ठेवावेत. 

३. कढाईत तेल नेहमीपेक्षा थोडे जास्त घेऊन त्यावर हळद आणि हिंग घालावे, मिरची, भरपूर लसुण घालून परतावे, मग कांदा घालून परतावा. अर्धवट शिजलेले दल तांदूळ व दाणे घालून त्यात अंबाडीची पिळलेली भाजी घालावी. 

४. निट मिक्स करून त्यावर मीठ घालावे,  लागल्यास पाणी घालावे. हि भाजी थोडीशी पातळसर करतात अगदी सुक्की नाही. व्यवस्थित शिजवून घ्यावी 


टीप : खाताना पुन्हा भाजीवरून लसुणाची फोडणी घालून खातात, 
         हि भाजी आंबट असली तरी यात गुळ घालत नाहीत
          हि भाजी भाकरी, दही , कांदा , ठेचा सोबत खावी अतिशय उत्कृष्ठ लागते   

Sunday 14 June 2015

Corn Rice - स्वीट कॉर्न पुलाव

Corn Rice - स्वीट कॉर्न पुलाव 

अगदी नैवेद्याला हि चालणारी… मस्त आणि नेहमीच्या मसालेभाताला छान पर्याय आहे हि रेसिपी …. यात आवडी प्रमाणे भाज्या घालू शकता पण दिलेल्या भाज्या सर्वात छान लागतात … 

साहित्य :

२ वाट्या तांदूळ 
सोललेले स्वीट कॉर्न पाऊण वाटी 
१ लहान सिमला मिरची 
१ टोमाटो 
१ मध्यम आकाराचा बटाटा 
तेल 
पुलाव किंवा बिर्याणी मसाला किंवा आवडत असेल तर खडा मसाला 
फोडणीचे साहित्य 
मीठ 
तिखट 
पाणी 

कृती :

१. तांदूळ धुवून १ तासासाठी भिजवावेत,  पाणी काढून , त्यात १ चमचा पुलाव मसाला, गरजेप्रमाणे मीठ, तिखट घालून मिक्स करून ठेवावे. 

२.  टोमाटो व सिमला मिरची  धुवून लांबट आकारात कापून घ्याव्यात , बटाटा साल काढून लांबट आकारात कापावेत फार बारीक कापू नये 

३. पातेल्यात किंवा कुकर मध्ये तेल गरम करून त्यात थोडे जिरे , हळद, हिंग घालावी, त्यावर चिरलेल्या भाज्या घालाव्यात व थोड्या परताव्यात. त्यावर भिजवलेले  तांदूळ घालावेत आणि नीट परतावे. 

४. तांदुळाच्या दुप्पट पाणी घालावे व कुकरचे झाकण लावून २-३ शिट्या काढाव्यात , पातेल्यात असल्यास अर्धवट झाकण ठेऊन लक्ष द्यावे म्हणजे कढ उतू जाणार नाही. हे मिश्रण सारखे हलवू नये तांदुळाची शिते तुटतात. गरज लागल्यास काटा चमच्याने हलवावे. 

५. शिजल्यावर गरम गरम सर्व्ह करावा त्यावर कोथिम्बिर आणि खोबरे घालून….  

Saturday 13 June 2015

अळिवाचे / हळिवाचे लाडु

खरतर या लाडवाची कृती पोस्टायला वेळ झाला … उन्हाळा आला आता पण तरीही आता वेळ आहे थोडा म्हणून आत्ता देती आहे … कृपया गोड मानून घ्या… 

साहित्य :-
१/३ वाटी स्वच्छ निवडलेले अळीव 
एक नारळ खोवलेला
दिड वाटी गुळ
२ चमचे तूप 
५-६ भिजउन साल काढलेले बदाम
आवडत असल्यास वेलची पावडर

कृती :-
अळीव स्वच्छ निवडुन घ्यावेत. त्यामधे बारिक खर असते. 
खाताना तोंडात आली तर लाडु खावासा वाटत नाही. 

१) नारळ पाण्यामध्ये अळिव किमान २ तास भिजउन ठेवावेत, जर पुरेसे नारळ पाणी नसेल तर साद्या पाण्यात किंवा दुधात भिजवावेत. 

२) अळीव नीट भिजल्यावर एका कढईत २ चमचे तुप वितळउन त्यावर चिरलेला गुळ  दिड वाटी घालावा. सतत हलवत रहावे.

३) गुळाला बुडबुडे आल्यावर एक खोवलेला ओला नारळ घालावा. खोबर्याची पाठ येऊ देऊ नये.  चांगले परतुन घ्यावे. 

४) आता त्यात भिजवलेले अळीव घालावे. बदामाचे तुकडे घालावे. अळीव ओले असल्यामुळे हे मिश्रण पातळ होईल. सतत हलवत रहावे.आच बारीकच ठेवावी. जवळ जवळ अर्ध्या तासात हळुहळु हे मिश्रण आळुन येईल. शिर्यापेक्षा थोडे आळले की बंद करावे. गार झाल्यावर लाडु वळावेत. 

 हे लाडु थोडे मऊसरच होतात. 
दिलेल्या साहित्यात १० लाडु होतील. 
४-५ दिवस शीतकपाटाबाहेर राहतात… 
बाळंतिणीला उत्तम आहेत, दुध वाढायला मदत होते. 
प्रकृतीने उष्ण आहेत . 

Pumkin Pancakes- Bhopalyache Thalipit

भोपळ्याचे थालीपीठ

वन फुल मिल….  बेष्ट रेसिपी आहे …क़धिहि ट्राय करा चुकत नाही … पोट भर आणि खमंग

साहित्य :-

२ वाटी लाल भोपळ्याचा खीस
२ चमचे बेसन
१ चमचा तांदूळ पिठी
१ चमचा कणिक
गरजेप्रमाणे ज्वारीचे  पीठ ( भाकरी चे )
१/२ चमचा आले लसुन कोथिम्बिर पेस्ट
मीठ
तिखट
तेल

  कृती :

१. एका मोठ्या ताटात भोपळ्याचा खीस, तिखट आले लसूण पेस्ट,  मीठ, अर्धा चमचा साखर घेवून एकत्र करावे, त्यात हळू हळू  सर्व पीठे मिक्स करावीत थोडासा पाण्याचा हात लावावा, भाकरीला मळतो त्यापेक्षा पीठ थोडे पातळ करावे

२. तवा नीट तापवून घ्यावा , पोळपाटावर एक कापड भिजवून घ्यावे त्यावर मळलेल्या पिठाचा गोळा ठेवून थापावा आणि त्याला मध्यभागी आणि त्याभोवातली बोटाने छिद्रे पाडावीत. 

३. तापलेल्या तव्यावर तेल लावून अलवार हाताने हे थालीपीठ टाकावे , झाकण ठेवावे , झाकणावर ४ थेंब पाणी घालावे आणि नीट  वाफ काढावी , पाणी उडून गेल्यावर झाकण काढून थालीपीठ दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावे

४. घरगुती चटण्या , लोणी , सॉस या सर्वाबरोबर हे थालीपीठ उत्तम लागते.  

Tuesday 9 June 2015

Soya Chunks Poha - सोया चंक्स पोहे

सोया चंक्स पोहे

हि रेसिपी तुम्ही नाश्ताला ट्राय करू शकता, बर्याचदा घरी सोया चंक्स आवडीने खाल्ले जात नाहीत. या रेसिपीत सोय चंक्स खुप छान लागतात आणि आवडीने खाल्ले जातात

साहित्य :
अर्धी वाटी भिजवलेले सोया चंक्स
२ वाटी जाड पोहे
तेल
१ कांदा
१ छोटा टोमाटो
२ मिरच्या
कोथिम्बिर
कढीपत्ता
फोडणीचे साहित्य
मीठ
साखर चवीनुसार

कृती :

१. सोय चंक्स ४ तास भिजवून ठेवावेत . कांदा आणि टोमाटो बारीक चिरून घ्यावा मिरचीचे एक इंचाचे तुकडे करावेत, पोहे चाळणीत भिजवावेत, त्यावर चवीनुसार मीठ आणि साखर घालून ठेवावी

२. कढईत तेल घालून, मोहरी, हळद, हिंग कढीपत्ता घालून फोडणी करावी, कांदा आणि टोमाटो घालावा व  थोडा परतावा, त्यावर  भिजवलेले सोया चंक्स घालून, परतून छान वाफ काढावी. चंक्स वाफवले गेले आहेत याची खात्री करावी

३. त्यावर भिजवलेले पोहे घालून, परतून, झाकण ठेवून निट वाफ काढावी. तयार झाल्यावर कोथिम्बिर घालून सर्व्ह करावे.

टीप : सोया चंक्स आधी वाफवून घेऊ शकता, या पोह्यात कोबी घातल्यास छान लागतो  

Tuesday 19 May 2015

मुगाचे डोसे

मुगाचे डोसे

नाश्ता किंवा जेवण म्हणून हि खाण्यासाठी अगदी उत्तम रेसिपी आहे …. यात जास्त प्रमाणात प्रोटीन्स असतात … वन डिश फुल मील …. असे आपण नक्की म्हणू शकतो …. लहान मुलांना डब्यात द्यायलाही छान आहे …. ब्रंच म्हणूनही करू शकता …. याबरोबर एखादे रंगीत सलाड केले तर याची पोष्टीकता जास्त वाढेल 


साहित्य :
डोस्यासाठी -
२ वाटी हिरवे मुग ( ८ तास भिजवलेले ) 
३/४ वाटी बारीक रवा ( ८ तास भिजवलेला )
२ चमचे तांदुळाचे पीठ 
आवडत असल्यास लोणी 
सोडा  
मीठ 

चटणी :-
ओले खोबरे 
मिरची 
लसुण  
आले
कोथिम्बिर 
कढीपत्ता  
मीठ 
जिरे पाव चमचा 
साखर चवीनुसार 

कृती :
१. प्रथम हिरवे मुग व रवा ८ तास वेगवेगळे भिजत घालावेत, नंतर मुग उपसून मिक्सरमधून फिरवून घ्यावेत, त्यात भिजलेला रवा २ चमचे तांदुळाचे पीठ ,थोडे मीठ, १/२ चमचा सोडा घालावा. गरज लागल्यास पाणी घालावे , हे मिश्रण नेहमीच्या डोस्याच्या पीठाइतके पातळ होत नाही, जर घट्टसरच असते.  

२. चटणीचे सर्व साहित्य मिक्सरवरून वाटून चटणी करावी, या चटणीत नेहमी पेक्षा आले जर जास्त घालावे मुगाच्या दोस्याबरोबर छान लागते. 

२. तवा तापवायला ठेवावा, निट तापला आहे याची खात्री करून, थोडेसे तेल लावून डोसे घालावेत आणि पीठ पसरवावे, आवडत असल्यास वरून लोणी घालावे व गरम गरम सर्व्ह करावेत …    

टीप : रवा व तांदुळाच्या पिठामुळे डोसे कुरकुरीत होतात
        दोस्यावर वरून मेतकुट हि शकतो 


Friday 15 May 2015

Karalyachi Bhaji- कारल्याची भाजी

कारल्याची भाजी

नावाने घाबरून जाऊ नका, हि कारल्याची भाजी चवीला अतिशय उत्तम लागते आणि जर काही कारणाने जसे आजारपणाने वगैरे जर तोंडाची चव गेली असेल आणि काही खावेसे वाटत नसेल तर हि भाजी करून पहा.
माझी ३ वर्षाची मुलगी सुद्धा भाजी नीट खाते.

साहित्य :

६-७ कारली
२ टोमाटो
१ कांदा
सुके खोबरे
८-१० लसूण पाकळ्या
१/२ इंच आले
कोथिम्बिर
पाऊण वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कुट
२ चमचे गुळ 
तिखट
मीठ
गोडा मसाला
फोडणीचे साहित्य

कृती :
१. प्रथम कारली स्वच्छ धुवून त्याचे २-२ इंचाचे तुकडे करून घ्यावेत, एका पातेल्यात पुरेसे पाणी उकळायला ठेऊन उकळी आल्यावर त्यात हि कारली घालावीत व वरून झाकण ठेवावे, १५ मिनिटे हे शिजू द्यावे, झाकण उघडू नये

२. कोथिम्बिर, आले, लसूण व २ चमचे सुके खोबरे मिक्सरवर वाटून घ्यावे , टोमाटो बारीक चिरून घ्यावा, एका खोलगट ताटलीत किंवा बाउल मध्ये बारीक चिरलेला टोमाटो, आले-लसुणाचे वाटण , शेंगदाण्याच कुट, गुळ , मीठ , तिखट , गोडा मसाला घालावा जरासे पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्यावी.

३. उकडलेली कारली घेऊन त्याचे शिल्लक पाणी काढून टाकावे, कारल्याचा तुकडा हातात धरून जरा  पिळून चमच्याच्या मागच्या भागाने कारल्याच्या बिया काढून घ्याव्यात, म्हणजे कारले पोकळ होईल.
देठा कडच्या तुकड्याचे सुद्धा बिया काढाव्यात , तो पूर्ण पोकळ होणार नाही .

४. आता तयार मसाला पोकळ कारल्यात भरावा , जरा नीट आणि दाबून भरावा. काही मसल शिल्लक राहिला तर तो भाजीत घालू शकतो ते जास्त छान लागते

५. आता काढीत फोडणी करून त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा, साधारण गुलाबी रंग झाल्यावर त्यात भरलेली कारली घालावीत आणि उरलेला मसाला पण घालावा, अर्धे भांडे पाणी घालून शिजवत ठेवावे, ५-७ मीनिटे शिजल्यावर भाजी तयार.

टीप : हि भाजी भाकरी बरोबर पण खूप छान लागते, त्यावेळी रस थोडा जास्त करावा.
         आवडत असल्यास या मधेही पाणी थोडे कमी जास्त करू शकता.
        कारली घेताना कडक आणि ताजी बघून घ्यावीत, कमी कडू लागतात

Monday 11 May 2015

Dessert Sunday Delite - संडे डिलाईट

Dessert Sunday Delite 

संडे डिलाईट 

साहित्य :

गार दुध
खजूर
बर्फ
फळे :-
चिक्कू
सफरचंद
केळे
आंबा
चेरी
वेन्नीला आईस्क्रीम
काजू, बदाम तुकडे
 गुलाब सरबत / स्ट्रोबेरी क्रश ( पाणी न घातलेले)

कृती :

१. खजुराच्या बिया काढून बारीक कापून घ्यावेत, मिक्सरच्या भांड्यात खजूर, दूध आणि बर्फ फिरवून घ्यावा. हे मीश्रण फार पातळ करू नये.
२. फळे साले काढून छोट्या तुकड्यात कापून घ्यावीत.
३. एक मोठा उभा काचेचा पेला घेऊन त्यात प्रथम खजूर शेक घालावा, मग एक एक प्रकारची फळे घालावीत,  त्यावर  गुलाब सरबत किंवा  स्ट्रोबेरी क्रश घालावा, परत त्यावर थोडा खजूर शेक घालावा.
४. त्यावर एक चमचा वेनिला आईस्क्रीम घालून मग थोडे फळांचे तुकडे, काजू बदाम घून एक चेरी वर ठेवावी आणि सर्व्ह करावे

टीप :- हा शेक खूप पौष्टिक आहे.
          यात आपण हवी ती फळे वापरू शकतो, अगदी पपई  सुद्धा
          आपणाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही मध घालू शकता त्याने खूप छान चव येते
     

Saturday 9 May 2015

Rasgulla- रसगुल्ला

रसगुल्ला 

मी हि पाककृती घरी करून पाहिली आहे काही वेळेला छान जमली काही वेळा मात्र अगदीच बिघडली, म्हणजे कधी गोळे घट्ट झाले तर कधी अगदी  मऊ  पडले काही वेळा आकार बदलला तर काही वेळा अगदी फुटून गेले, याला सरावाची गरज आहे फक्त वाचून येणे जरा अवघड आहे. त्यामुळे शक्यतो आधी थोडे प्रमाण घेऊन करावे आणि नीट जमल्यावर मोठ्या प्रमाणात करावे. याला शक्यतो गाईचे दुध घ्यावे म्हणजे त्याला तूप सुटत नाही. मिळत नसेल तर टोण्ड दुध घ्यावे .

साहित्य :
अर्धा लिटर गाईचे दुध
१/२ चमचा लिंबाचा रस
१/२ वाटी साखर
१ चमचा मैदा/ कणिक

कृती :

१. दुध उकळण्यासाठी ठेवावे, सतत हलवत राहावे म्हणजे त्यावर साय जमणार नाही शिवाय खाली  नाही .
२. दुधाला नीट उकळी फुटल्यावर त्यात लिंबाचा रस घालावा.
३. लगेच दुध फाटेल आणि साका -पाणी दिसू लागेल, आता हे नीट वेगवेगळे झाल्यावर एका गाळण्याने किंवा मलमलच्या  कापडाने  गाळून घ्यावे आणि पाण्याखाली ३ दा  धुवून घ्यावे, लिंबाचा वास पूर्णपणे गेला आहे याची खात्री करावी.
४. चक्का करताना जसे दही बांधून ठेवतो तसे साका बांधून, टांगुन ठेवावा म्हणजे त्यातील पाणी निथळून जाईल, २-३ तास ठेवावे. ( याचे मऊ पनीर तयार होते )
५. नंतर तयार  पनीर एका ताटात काढावे त्यात एक चमचा मैदा किंवा कणिक घालावी आणि मळावे हे जितके छान मळले जाईल तितके रसगुल्ले जाळीदार होतात. मळलेल्या गोळ्याचे  गोळे करावेत.
६.  पातेल्यात दीड वाटी पाणी घालून त्यात साखर घालून उकळत ठेवावे. उकळी फुटल्यावर जात साखरेत काही मळ  असल्यास गाळण्याने काढून घ्यावा.
७. उकळत्या पाकात तयार गोळे सोडून ८-१०  मिनिटे झाकून आच बारीक करून ठेवावेत. मधून मधून झाकण उघडून गोळे नित आहेत याची खात्री करावी.

गार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेऊन गार करून सर्व्ह करावेत

टीप :
हेच गोळे रसमलाई किंवा अंगूरमलई साठी वापरता येतात पण त्याचा आकार लहान करावा लागतो.

मी बऱ्याच पाककृतीचे फोटो टाकले नाहीयेत मी लवकरच ते अपलोड करेन.

 


Wednesday 29 April 2015

Chinese Batata Vada -चायनीज बटाटा वडा

चायनीज बटाटा वडा 

साहित्य:
६ बटाटे 
५-६ पाकळ्या लसुण 
१ इंच आले
चायनीज शेजवान चटणी 
४ मोठे चमचे बेसन 
१ चमचा तांदुळाचे पीठ 
१ चिमट कण्याचा सोडा 
मीठ 
हळद 
तिखट 
तळण्यासाठी तेल
पावभाजीचे पाव 
टोमाटो सॉस 
कच्चा कांदा ( उभा चिरलेला )

कृती :

१. प्रथम बटाटे उकडून चुरून घ्यावेत. 
२. लसूण, आले यांची पेस्ट तयार करावी 
३. बटाट्यात हि तयार पेस्ट, मीठ, शेजवान चटणी घालावी  व एकत्र मळून घ्यावे. 
४.  एका बाउल मध्ये बेसन व तांदुळाचे पीठ, त्यात मीठ, हळद , तिखट, चिमुटभर खाण्याचा सोडा घालावा आणि बेताने पाणी घालावे व पेस्ट तयार करावी
५. कढईत  तेल गरम करण्यास ठेवावे. 
६. मळलेल्या बटाट्याचे गोळे करावेत व हातावर थोडे दाबून घेऊन बेसन पिठात हा गोळा घोळवून तापलेल्या तेलात बेताने सोडावा. 
७. सोनेरी रंगावर तळून, पावभाजीचा पाव मधून कापून त्याला आतील बाजूने टोमाटो सॉस लाऊन कांद्या सोबत गरम गरम खाण्यास घ्यावा.   

टीप : बटाट्याच्या उरलेल्या भाजीचे देखील मळून वडे करता येतात. 
         टोमाटो सॉस ऐवजी इतर हि प्रकारचे सॉस जसे चिली सॉस लावून खाऊ शकतो. 

Monday 20 April 2015

नाचणीची आंबील

नाचणीची आंबील 

साहित्य :

३ चमचे नाचणीचे पीठ
१ चमचा तेल/तूप
५-६ पाकळ्या लसूण
जिरे
कोथिम्बिर
पुदिना पाने
मीठ
ताक
चाट मसाला
६०० मिली पाणी

कृती :
१. पातेल्यात एक चमचा तेल/तुपावर लसुण परतावा, त्यात थोडे जिरे घालावेत.त्यात पाणी घालून उकळत ठेवावे
२. नाचणीच्या पिठात गार पाणी घालून त्याची पेस्ट करावी, गुठळ्या होऊ देऊ नयेत.
३. पाण्याला उकळी आल्यावर त्यात नाचणीची पेस्ट व मीठ घालावी, सतत हलवत राहावे गुठळ्या होऊ देऊ नयेत, २-३ मिनिटे उकळल्यानंतर आच बंद करावी , आंबील पूर्ण थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवावी.
४. प्यायला घेताना ग्लासमध्ये थंड गार आंबील, त्यात थोडे ताक, वरून थोडा चाट मसाला, बारीक चिरलेला पुदिना व कोथिम्बिर घालावी.

टीप : हि आंबील उन्हाळ्यात पिल्यास उन्हाळ्याचा त्रास होत नाही, नाचणी थंड असते, लहान मुलानाही आवडते 

Tuesday 14 April 2015

Sun Dried Potato Chips- वाळवणीचे बटाटा चिप्स

वाळवणीचे बटाटा चिप्स 

आता उन्हाळा सुरु झाला आहे.  त्या बरोबरच नवर्याने मागे भुणभुण सुरु केली आहे. वाळवणीचे खूप काही करत नाही मी पण तरीही बटाटा वेफर्स मस्ट आहेत घरी … मागच्या वेळी बाहेरून आणले पण ते इतके वाईट होते कि कोणी खाल्लेच नाहीत. खूप सहज सोपे आहेत करणे…

साहित्य :
बटाटे 
चिमुटभर तुरटी 
मीठ 

कृती :

१. प्रथम बटाटे १५-२० मिनिटे पाण्यात भिजऊन ठेवावेत. 
२. एका मोठ्या पातेल्यात पाणी त्यात चिमुटभर तुरटी घोळवून घ्यावी. 
३. बटाट्याची साले काढून पातळ चिप्स पाडाव्यात. 
४. हे चिप्स १०-१५ मिनिटांसाठी तुरटीच्या पाण्यात घालावेत 
५. दुसर्या मोठ्या पातेल्यात पाणी त्यात पुरेसे मीठ घालून उकळत ठेवावे. 
६. नीट उकळी फुटल्यावर त्यात बटाट्याच्या चिप्स घालाव्यात, २ मिनिटे उकळी येऊ द्यावी
७. हे सारे एका चाळणीत ओतून पाणी काढून टाकावे, व गार पाण्यात हात बुडवून एका सुती कापडावर हे चिप्स  उन्हात वाळत घालावेत, एकमेकाला चिकटू देऊ नये 
८. नीट वाळवून एका डब्यात भरून ठेवावे, गरजेनुसार तळून खावेत, हे वर्षभर टिकतात.


Monday 13 April 2015

Louki cutlet -दुधी भोपळ्याच्या वड्या

दुधी भोपळ्याच्या वड्या

साहित्य :
१ मध्यम आकाराचा दुधी भोपळा
४ मोठे चमचे गव्हाचे पीठ
२ मोठे चमचे बेसन
२ मोठे चमचे तांदळाचे पीठ
१ मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
७-८ पाकळ्या लसुन
१/२ इंच आले
पाऊण वाटी चिरलेली कोथिम्बिर
२  मिरच्या वाटून
मीठ 
कढीपत्ता गरजेनुसार
पांढरे तीळ गरजेनुसार
तेल गरजेनुसार
मोहरी गरजेनुसार 
हळद गरजेनुसार  

कृती :
१. प्रथम सर्व पीठे वेगवेगळी भाजून आणि थंड करत ठेवावी. 
२. दुधी भोपळा साल काढून मोठ्या खिसणीने खिसुन घ्यावा.
३. आले, लसुन, मिरची यांची पेस्ट आणि मीठ खिसावर घालावी, त्यावर चिरलेली कोथिम्बिर घालावी. 
४. सर्व पीठे  झाल्यावर  घालावी, शेंगदाण्याचे कूट घालावे. 
५. किंचित लाऊन पाण्याचा हात हे मिश्रण मळावे,  घट्ट अथवा फार सैल नये, मध्यम असावे. 
६.  तेलाचा हात लाऊन याचे हलक्या हाताने मुटके करून चाळणीला तेल लावून २० मिनिटे उकडून घ्यावेत 
७. नीट थंड झाल्यावर याच्या वड्या पाडाव्यात. 
८. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हळद, कढीपत्त्याची पानें, तीळ घालावे, त्यात या  तयार वड्या घालून खमंग परतावे     

Tuesday 7 April 2015

Eggless Semolina Cake - बिन अंड्याचा रव्याचा केक

रव्याचा केक 


साहित्य :
१.५ वाटी बारीक रवा 
१ वाटी साधी साखर 
१ वाटी दही 
३ चमचे लोणी 
दुध गरजेप्रमाणे 
१/२ चमचा सोडा 
१/२ चमचा वेनिला इसेन्स 


वेळ : तयारी ३० मिनिटे, पाककृती ४५ मिनिटे 


कृती :
१. एका पातेल्यात दही आणि साखर एकत्र फेटून घ्या.  
२. साखर पूर्ण विरघळली कि त्यात दीड वाटी बारीक रवा घाला, नीट एकत्र करा
३. त्यात ३ चमचे लोणी घाला आणि थोडे फेटून घ्या. अर्धा तास हे मिश्रण तसेच ठेऊन द्या 
४. रवा फुगून मिश्रण घट्ट झालेले असेल , त्यात थोडे दुध घालून पुन्हा थोडे फेटा
५. हे मिश्रण ६-७ तासांसाठी तसेच ठेऊन द्या, अधूनमधून फेटत राहा आणि गरज लागेल तसे दुध घाला. चमचा उचलल्यास हे मिश्रण रिबीन सारखे पडायला हवे इतकेच पातळ असावे 
६. ६-७ तासानंतर हे मिश्रण निट फुगून आलेले दिसेल, त्यात  इसेन्स अर्धा चमचा आणि अर्धा चमचा घालून फेटून घ्या 
७. केकच्या तीन ला थोडे तूप लाऊन त्यावर किंचित मैदा भुरभुरून घ्या, त्यावर हे तयार मिश्रण घाला
८. ओव्हन १८० डिग्रीवर ३ मिनिटे प्रि हिट करून त्यात हा टीन ३५ मिनिट साठी बेक करावा 
९. केकच्या मध्ये सुरी घालून पहा सुरी जर स्वच्छ बाहेर आली तर केक झाला असे समजावे 




 

Papaya Jam - पपईचा जाम

पपईचा जाम

साहित्य:
१ मध्यम आकाराची पपई ( खूप पक्व नको, थोडी कच्ची घ्यावी, एक ते दोन दिवसात पिकेल अशी)
साखर 
जायफळाची पूड 
१/२ लिंबू 

कृती :
१. पपई चिरून मग खिसुन घ्यावी. 
२. खिसलेली पपई वतीने मोजून घ्यावी व त्याच्या ३/४ साखर घालावी म्हणजे जर पपईचा खीस दोन वाट्या झाला तर दिड वाटी साखर घालावी, त्यात अर्धा लिंबू पिळावा , जड बुडाच्या पातेल्यात शिजवायला ठेवावी. सतत हलवत राहावे अथवा खाली हे मिश्रण लागेल 
३. शिजल्यावर हे मिश्रण एकत्र मिळून येऊ लागेल मग आच बंद करावी आणि त्यात आवडत असल्यास थोडी जायफळ पूड घालावी 
४. पूर्ण गार झाल्यावर एका स्वच्छ आणि कोरड्या शक्यतो काचेच्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवावी, हा जाम चपाती किंवा फुलाक्याबरोबर लाऊन खायला खूप छान लागतो 

Wednesday 1 April 2015

Kolhapuri Misal - कोल्हापूरी मिसळ

कोल्हापूरी मिसळ 

साहित्य :

मोड आलेली मटकी ४ वाट्या 
२ बटाटे
२ कांदे 
२ टोमाटो 
८-१० लसुन पाकळ्या 
१ इंच आले
सुके खोबरे  
कढीपत्ता 
कोथिंबीर 
मोहरी 
हळद 
हिंग 
गरम मसाला
तिखट
मीठ  

पाव / ब्रेड 
फरसाण
लिंबू

लागणारा वेळ:
१ तास 

कृती:
१. प्रथम कुकरमध्ये मोड आलेली मटकी घेऊन ३-४ शिट्या काढून नीट शिजउन घ्यावी. 
२. १ कांदा, २ टोमाटो, २ बटाटे चिरून घ्यावेत 
३. एका लहान पातेल्यात अथवा कढईत थोडे तेल घेऊन त्यावर चिरलेल्या लसुन पाकळ्या, आले, सुके खोबरे, थोडे जिरे, ४-५ मिरे, घालून नीट परतून घ्यावे , आणि हे मिश्रण थोडे पाणी घालून अथवा तसेच मिक्सर मधून काढून घ्यावे 
४. एका पातेल्यात फोडणी घालून त्यात मोहरी, हळद , हिंग , कढीपत्ता घालावा मग त्यात मिक्सर मधून बारीक केलेले मिश्रण घालावे आणि हालवावे त्यात चिरलेला कांदा, टोमाटो , बटाटा घालून परतावे आणि पाणी घालून शिजायला ठेवावे 
५. बटाटा शिजल्यावर त्यात उकडलेली मटकी घालावी, वरून तिखट,  मीठ, गरम मसाला घालून पुरेसे पाणी घालून उकळत ठेवावे 
६. एक कांदा बारीक चिरून आणि लिंबू कापून घ्यावे 
७. १० मिनिटे उकळल्यानंतर एका बाउल मध्ये हि तयार उसळ त्यावर बारीक चिरलेला कांदा, लिंबू , आणि फरसाण घालून पावाबरोबर खाण्यास घ्यावे  
८. आवडत असल्यास मिसळीवर चमचाभर दही टाकून घेऊ शकतो, तेही खूप छान लागते 

टीप : यात सर्व प्रकारचे मोड एकत्र वापरू शकतो 
      फरसाण ऐवजी चिवडा वापरू शकतो ( पण कोल्हापुरी मिसळ मध्ये फरसाणच वापरतात :-))
 

Monday 23 March 2015

Solkadhi - सोलकढी

थंडगार सोलकढी

साहित्य :

१ ओला नारळ खोवलेला
४-५
चांगली रसरशीत आमसुले किंवा अर्धी वाटी कोकम आगळ
४ पाकळ्या लसूण
आले छोटा तुकडा
१ मिरची
मीठ चवीनुसार
कोथिम्बिर बारीक चिरून
५०० ml  गार पाणी

कृती :
१.  नारळाच्या खिसात पाणी  घालून मिक्सरमधून  फिरऊन घ्यावे आणि स्टीलच्या गाळण्यातून  नारळाचे दुध गाळून घ्यावे , गाळण्यावर दाब देऊन नीट सगळा रस काढावा.
२.  परत नारळाचा खीस मिक्सरमध्ये घालून त्यात आमसुले, लसूण, आले, मिरची, हे सारे फिरवावे  परत गाळून घ्यावे. हीच क्रिया त्याच नारळाच्या खिसावर २-३ वेळा करावी पण नारळाचे दुध फार पाणचट करू नये.
आगळ घातल्यास ते मिक्सरवरून फिरवले नाही तरी चालते ( आमसुले आवडीनुसार आणि आंबटपणानुसार कमी जास्त केली तरी चालतात , आगळ घालताना थोडे थोडे घालावे, अधून मधून चव घेऊन पाहावे म्हणजे खूप आंबट होणार नाही )
३. अमसुलामुळे नारळाच्या  दुधाला थोडासा गुलाबीसर येतो, त्यात चवीनुसार मीठ घालावे आणि वरून बारीक चिरलेली कोथिम्बिर भुरभुरावी
४. आवडत असल्यास वरून जीऱ्याची फोडणी घालावी (नुसतेहि छान लागते)

थंड करून प्यावी अथवा जेवताना घ्यावी.


Saturday 14 March 2015

Puranpoli - पुरणपोळी

पुरणाच्या पोळ्या

लागणारा वेळ : १. ५ तास
पुरणपोळी 

साहित्य:

१ वाटी हरभरा डाळ (२-३ तास पाण्यात भिजवलेली)
१ वाटी गुळ
१ चमचा भाजलेल्या बडीशेपेची भरड
१ चमचा छोटा वेलची पावडर
२ वाटी  गव्हाचे पीठ
१ वाटी तांदळाचे पीठ ( असल्यास)
३ चमचे तेल
चवीनुसार मीठ
मळण्यासाठी पाणी
साजूक तूप

कृती :

१. हरभरा डाळ कुकरला लावून ४-५ शिट्या काढून घ्याव्यात , डाळ पूर्ण मऊ शिजली पाहिजे .

२. कुकर गार होईपर्यंत कणिकेत थोडे मीठ आणि तेल घालून मळावे, कणिकेला चांगले १५-२० मिनिटे पाण्याचा हात लाऊन मळत राहावे. मध्ये मध्ये कणकेचा थोडा तुकडा हातात घेऊन तो दोन बाजूने ओढून पाहावा, तो व्यवस्थित लांब होत असेल व लगेच तुटत नसेल तर कणिक मळून झाली असे समजावे. त्यावर तेलाचा हात फिरऊन गोळा  झाकून ठेवावा.

३. कुकर मधील डाळीतील पाणी आणि थोडी शिजलेली डाळ बाजूला काढावी, याची कटाची आमटी करतात
जर आमटी नको असेल तर फक्त पाणी काढावे. यामध्ये गुळ घालून परत शिजवायला ठेवावे, हे पुरण सतत हलवत राहावे नाहीतर तळाला लागते. पुरण तयार होत आले कि ते भांड्याच्या कडा सोडून गोळा होईन येऊ लागते, आणि हाताला हलवण्यास जड येते. पुरण घट्टसर करून घ्यावे.

४. खाली उतरउन त्यात वेलची पावडर आणि बडीशेपेची भरड घालावी, आणि गरमच पुरणयंत्रावरून   फिरवून घ्यावे , जर पुरण यंत्र नसेल तर हल्ली जाळ्या मिळतात त्यावरून जरी गाळून घेतले तरी चालेल

५. पुरण गार झाले कि त्याचे गोळे करून घ्यावेत, तवा तापत ठेवावा, उलथने जवळ ठेवावे. आता मळलेल्या कणीकेचा  पुरणाच्या गोळ्याच्या निम्मा किंवा थोडा कमीच गोळा घ्यावा , त्याला हातावर खोलगट आकार देऊन त्यात पुरणाचा गोळा ठेवावा, आणि कणिकेचे तोंड हळूहळू मिटुन घ्यावे ( हे काम अतिशय काळजीपूर्वक करावे) तयार गोळा हळू हळू चपटा करून तांदळाच्या पिठात घोळऊन पोळपाटावर अगदी हलक्या हाताने लाटावा. लाटताना पोळीच्या कडे पर्यंत पुरण जाईल याची काळजी घ्यावी.

६. तयार पोळी हळुवार हाताने तव्यावर टाकावी ( अवघड वाटत असल्यास एका पुरेशा मोठ्या कागदाचा तुकडा प्रथम पोळीवर झाकावा नंतर पोळपाट उचलून पोळी कागदावर घेऊन मग तव्यावर टाकावी.

७. मध्यम आचेवर पोळी दोन्ही बाजूने नीट खरपूस भाजून घ्यावी , परताना पोळी मोडणार नाही याची काळजी घावी.

८. तव्यावरून काढून गरम गरम असताना तुपाची धार सोडून खावे.

या साहित्यात ८-१० पोळ्या होतील.   

Thursday 12 March 2015

Bhadang - कोल्हापुरी भडंग

कोल्हापुरी भडंग 

साहित्य:
५०० ग्राम कोल्हापुरी चिरमुरे/ कुरमुरे
१ वाटी शेंगदाणे
१०-१२ कुड्या सोलून
१५-२० कढीपत्ताची पाने
१ चमचा तिखट
१-२ चमचा मेतकुट
१ चमचा पिठीसाखर
चवीनुसार मीठ
१/२ वाटी तेल
तेल  फोडणीसाठी
मोहरी गरजेनुसार
हळद गरजेनुसार

वेळ : १० मिनिटे

कृती :
१. चिरमुरे एका मोठ्या परातीत अथवा डब्यात काढावेत, कुरकुरीत असल्याची खात्री करून घ्यावी जर मऊ पडले असतील कढईत किंवा ओव्हन मध्ये गरम करावेत.
२. एका छोट्या ताटलीमध्ये १/२ वाटी तेल त्यात मेतकुट, मीठ, तिखट, पिठीसाखर सगळे मिसळून घ्यावे, ते सर्व चिरमुरयांना व्यवस्थित लावून घ्यावे.
३. छोट्या कढईत पुरेसे तेल गरम करून त्यात प्रथम शेंगदाणे घालावेत, छान सोनेरी रंग आल्यावर मोहरी, हळद, चिरलेल्या लसूणाच्या कुड्या आणि कढीपत्ताची पाने घालावीत.
४. हि फोडणी गरमच मसाला लावलेल्या चिरमुरयांन्वर घालावी आणि परत सगळे व्यवस्थित मिक्स करावे.

खमंग कुरकुरीत भडंग तयार

* हि भडंग भेळ करताना वापरली तर भेळ खूप छान लागते 

Healthy Khajur Barfi - खजुराच्या वड्या

खजुराच्या वड्या

लागणारा वेळ : ४५ मिनिट 

साहित्य :
५०० ग्राम  काळे खजूर 
८-१०  सुके अंजीर 
१/२ वाटी काजूचे तुकडे 
१/२ वाटी बदामाचे तुकडे  
१/४ वाटी  खसखस 
२ चमचे साजूक तूप 


कृती :
१. खजुराच्या बिया काढून त्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत , सुके अंजीराचेही बारीक काप करावेत 
२. कढईत खसखस भाजून बाजूला काढून घ्यावी. 
३. त्याच कढईत १ चमचा तूप गरम करून त्यावर काजू व बदामाचे तुकडे भाजून घ्यावेत आणि एका ताटात काढावेत. 
४. त्याच तुपावर  खजूर आणि अंजीर घालून नीट परतावे, १० मिनिटात ते मऊ होईल. गेस वरून खाली काढून  हे मिश्रण गरम असतानाच मिक्सर वरून फिरून घ्यावे.  
५. परत कढईत १ चमचा तूप गरम करून त्यावर खजुराचा मिश्रणाचा गोल आणि काजू आणि बदामाचे काप घालून ३-४ मिनिट परतावे , सर्व नीट मिक्स करून घ्यावे. 
६. पोळपाट लाटण्यावर तुपाचा हात फिरून त्यावर हा मिश्रणाचा गोळा लाटुन वड्या  पाडाव्यात 
७. या वड्या एका ताटात काढून १० मिनिटे फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवाव्यात.  

गार झाल्यावर या वड्या खाण्यास तयार आहेत.  
या वद्य १० ते १५ दिवस  नीट टिकतात.  

* यात हवे असल्यास सर्व प्रकारचा सुका मेवा घालू शकता.  
* चांदीच्या वर्खाने सजवल्यास खूप छान दिसते आणि खास लहान  मुलांसाठी केल्या तर ते खूप आवडीने खातात.