Wednesday 29 April 2015

Chinese Batata Vada -चायनीज बटाटा वडा

चायनीज बटाटा वडा 

साहित्य:
६ बटाटे 
५-६ पाकळ्या लसुण 
१ इंच आले
चायनीज शेजवान चटणी 
४ मोठे चमचे बेसन 
१ चमचा तांदुळाचे पीठ 
१ चिमट कण्याचा सोडा 
मीठ 
हळद 
तिखट 
तळण्यासाठी तेल
पावभाजीचे पाव 
टोमाटो सॉस 
कच्चा कांदा ( उभा चिरलेला )

कृती :

१. प्रथम बटाटे उकडून चुरून घ्यावेत. 
२. लसूण, आले यांची पेस्ट तयार करावी 
३. बटाट्यात हि तयार पेस्ट, मीठ, शेजवान चटणी घालावी  व एकत्र मळून घ्यावे. 
४.  एका बाउल मध्ये बेसन व तांदुळाचे पीठ, त्यात मीठ, हळद , तिखट, चिमुटभर खाण्याचा सोडा घालावा आणि बेताने पाणी घालावे व पेस्ट तयार करावी
५. कढईत  तेल गरम करण्यास ठेवावे. 
६. मळलेल्या बटाट्याचे गोळे करावेत व हातावर थोडे दाबून घेऊन बेसन पिठात हा गोळा घोळवून तापलेल्या तेलात बेताने सोडावा. 
७. सोनेरी रंगावर तळून, पावभाजीचा पाव मधून कापून त्याला आतील बाजूने टोमाटो सॉस लाऊन कांद्या सोबत गरम गरम खाण्यास घ्यावा.   

टीप : बटाट्याच्या उरलेल्या भाजीचे देखील मळून वडे करता येतात. 
         टोमाटो सॉस ऐवजी इतर हि प्रकारचे सॉस जसे चिली सॉस लावून खाऊ शकतो. 

Monday 20 April 2015

नाचणीची आंबील

नाचणीची आंबील 

साहित्य :

३ चमचे नाचणीचे पीठ
१ चमचा तेल/तूप
५-६ पाकळ्या लसूण
जिरे
कोथिम्बिर
पुदिना पाने
मीठ
ताक
चाट मसाला
६०० मिली पाणी

कृती :
१. पातेल्यात एक चमचा तेल/तुपावर लसुण परतावा, त्यात थोडे जिरे घालावेत.त्यात पाणी घालून उकळत ठेवावे
२. नाचणीच्या पिठात गार पाणी घालून त्याची पेस्ट करावी, गुठळ्या होऊ देऊ नयेत.
३. पाण्याला उकळी आल्यावर त्यात नाचणीची पेस्ट व मीठ घालावी, सतत हलवत राहावे गुठळ्या होऊ देऊ नयेत, २-३ मिनिटे उकळल्यानंतर आच बंद करावी , आंबील पूर्ण थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवावी.
४. प्यायला घेताना ग्लासमध्ये थंड गार आंबील, त्यात थोडे ताक, वरून थोडा चाट मसाला, बारीक चिरलेला पुदिना व कोथिम्बिर घालावी.

टीप : हि आंबील उन्हाळ्यात पिल्यास उन्हाळ्याचा त्रास होत नाही, नाचणी थंड असते, लहान मुलानाही आवडते 

Tuesday 14 April 2015

Sun Dried Potato Chips- वाळवणीचे बटाटा चिप्स

वाळवणीचे बटाटा चिप्स 

आता उन्हाळा सुरु झाला आहे.  त्या बरोबरच नवर्याने मागे भुणभुण सुरु केली आहे. वाळवणीचे खूप काही करत नाही मी पण तरीही बटाटा वेफर्स मस्ट आहेत घरी … मागच्या वेळी बाहेरून आणले पण ते इतके वाईट होते कि कोणी खाल्लेच नाहीत. खूप सहज सोपे आहेत करणे…

साहित्य :
बटाटे 
चिमुटभर तुरटी 
मीठ 

कृती :

१. प्रथम बटाटे १५-२० मिनिटे पाण्यात भिजऊन ठेवावेत. 
२. एका मोठ्या पातेल्यात पाणी त्यात चिमुटभर तुरटी घोळवून घ्यावी. 
३. बटाट्याची साले काढून पातळ चिप्स पाडाव्यात. 
४. हे चिप्स १०-१५ मिनिटांसाठी तुरटीच्या पाण्यात घालावेत 
५. दुसर्या मोठ्या पातेल्यात पाणी त्यात पुरेसे मीठ घालून उकळत ठेवावे. 
६. नीट उकळी फुटल्यावर त्यात बटाट्याच्या चिप्स घालाव्यात, २ मिनिटे उकळी येऊ द्यावी
७. हे सारे एका चाळणीत ओतून पाणी काढून टाकावे, व गार पाण्यात हात बुडवून एका सुती कापडावर हे चिप्स  उन्हात वाळत घालावेत, एकमेकाला चिकटू देऊ नये 
८. नीट वाळवून एका डब्यात भरून ठेवावे, गरजेनुसार तळून खावेत, हे वर्षभर टिकतात.


Monday 13 April 2015

Louki cutlet -दुधी भोपळ्याच्या वड्या

दुधी भोपळ्याच्या वड्या

साहित्य :
१ मध्यम आकाराचा दुधी भोपळा
४ मोठे चमचे गव्हाचे पीठ
२ मोठे चमचे बेसन
२ मोठे चमचे तांदळाचे पीठ
१ मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
७-८ पाकळ्या लसुन
१/२ इंच आले
पाऊण वाटी चिरलेली कोथिम्बिर
२  मिरच्या वाटून
मीठ 
कढीपत्ता गरजेनुसार
पांढरे तीळ गरजेनुसार
तेल गरजेनुसार
मोहरी गरजेनुसार 
हळद गरजेनुसार  

कृती :
१. प्रथम सर्व पीठे वेगवेगळी भाजून आणि थंड करत ठेवावी. 
२. दुधी भोपळा साल काढून मोठ्या खिसणीने खिसुन घ्यावा.
३. आले, लसुन, मिरची यांची पेस्ट आणि मीठ खिसावर घालावी, त्यावर चिरलेली कोथिम्बिर घालावी. 
४. सर्व पीठे  झाल्यावर  घालावी, शेंगदाण्याचे कूट घालावे. 
५. किंचित लाऊन पाण्याचा हात हे मिश्रण मळावे,  घट्ट अथवा फार सैल नये, मध्यम असावे. 
६.  तेलाचा हात लाऊन याचे हलक्या हाताने मुटके करून चाळणीला तेल लावून २० मिनिटे उकडून घ्यावेत 
७. नीट थंड झाल्यावर याच्या वड्या पाडाव्यात. 
८. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हळद, कढीपत्त्याची पानें, तीळ घालावे, त्यात या  तयार वड्या घालून खमंग परतावे     

Tuesday 7 April 2015

Eggless Semolina Cake - बिन अंड्याचा रव्याचा केक

रव्याचा केक 


साहित्य :
१.५ वाटी बारीक रवा 
१ वाटी साधी साखर 
१ वाटी दही 
३ चमचे लोणी 
दुध गरजेप्रमाणे 
१/२ चमचा सोडा 
१/२ चमचा वेनिला इसेन्स 


वेळ : तयारी ३० मिनिटे, पाककृती ४५ मिनिटे 


कृती :
१. एका पातेल्यात दही आणि साखर एकत्र फेटून घ्या.  
२. साखर पूर्ण विरघळली कि त्यात दीड वाटी बारीक रवा घाला, नीट एकत्र करा
३. त्यात ३ चमचे लोणी घाला आणि थोडे फेटून घ्या. अर्धा तास हे मिश्रण तसेच ठेऊन द्या 
४. रवा फुगून मिश्रण घट्ट झालेले असेल , त्यात थोडे दुध घालून पुन्हा थोडे फेटा
५. हे मिश्रण ६-७ तासांसाठी तसेच ठेऊन द्या, अधूनमधून फेटत राहा आणि गरज लागेल तसे दुध घाला. चमचा उचलल्यास हे मिश्रण रिबीन सारखे पडायला हवे इतकेच पातळ असावे 
६. ६-७ तासानंतर हे मिश्रण निट फुगून आलेले दिसेल, त्यात  इसेन्स अर्धा चमचा आणि अर्धा चमचा घालून फेटून घ्या 
७. केकच्या तीन ला थोडे तूप लाऊन त्यावर किंचित मैदा भुरभुरून घ्या, त्यावर हे तयार मिश्रण घाला
८. ओव्हन १८० डिग्रीवर ३ मिनिटे प्रि हिट करून त्यात हा टीन ३५ मिनिट साठी बेक करावा 
९. केकच्या मध्ये सुरी घालून पहा सुरी जर स्वच्छ बाहेर आली तर केक झाला असे समजावे 




 

Papaya Jam - पपईचा जाम

पपईचा जाम

साहित्य:
१ मध्यम आकाराची पपई ( खूप पक्व नको, थोडी कच्ची घ्यावी, एक ते दोन दिवसात पिकेल अशी)
साखर 
जायफळाची पूड 
१/२ लिंबू 

कृती :
१. पपई चिरून मग खिसुन घ्यावी. 
२. खिसलेली पपई वतीने मोजून घ्यावी व त्याच्या ३/४ साखर घालावी म्हणजे जर पपईचा खीस दोन वाट्या झाला तर दिड वाटी साखर घालावी, त्यात अर्धा लिंबू पिळावा , जड बुडाच्या पातेल्यात शिजवायला ठेवावी. सतत हलवत राहावे अथवा खाली हे मिश्रण लागेल 
३. शिजल्यावर हे मिश्रण एकत्र मिळून येऊ लागेल मग आच बंद करावी आणि त्यात आवडत असल्यास थोडी जायफळ पूड घालावी 
४. पूर्ण गार झाल्यावर एका स्वच्छ आणि कोरड्या शक्यतो काचेच्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवावी, हा जाम चपाती किंवा फुलाक्याबरोबर लाऊन खायला खूप छान लागतो 

Wednesday 1 April 2015

Kolhapuri Misal - कोल्हापूरी मिसळ

कोल्हापूरी मिसळ 

साहित्य :

मोड आलेली मटकी ४ वाट्या 
२ बटाटे
२ कांदे 
२ टोमाटो 
८-१० लसुन पाकळ्या 
१ इंच आले
सुके खोबरे  
कढीपत्ता 
कोथिंबीर 
मोहरी 
हळद 
हिंग 
गरम मसाला
तिखट
मीठ  

पाव / ब्रेड 
फरसाण
लिंबू

लागणारा वेळ:
१ तास 

कृती:
१. प्रथम कुकरमध्ये मोड आलेली मटकी घेऊन ३-४ शिट्या काढून नीट शिजउन घ्यावी. 
२. १ कांदा, २ टोमाटो, २ बटाटे चिरून घ्यावेत 
३. एका लहान पातेल्यात अथवा कढईत थोडे तेल घेऊन त्यावर चिरलेल्या लसुन पाकळ्या, आले, सुके खोबरे, थोडे जिरे, ४-५ मिरे, घालून नीट परतून घ्यावे , आणि हे मिश्रण थोडे पाणी घालून अथवा तसेच मिक्सर मधून काढून घ्यावे 
४. एका पातेल्यात फोडणी घालून त्यात मोहरी, हळद , हिंग , कढीपत्ता घालावा मग त्यात मिक्सर मधून बारीक केलेले मिश्रण घालावे आणि हालवावे त्यात चिरलेला कांदा, टोमाटो , बटाटा घालून परतावे आणि पाणी घालून शिजायला ठेवावे 
५. बटाटा शिजल्यावर त्यात उकडलेली मटकी घालावी, वरून तिखट,  मीठ, गरम मसाला घालून पुरेसे पाणी घालून उकळत ठेवावे 
६. एक कांदा बारीक चिरून आणि लिंबू कापून घ्यावे 
७. १० मिनिटे उकळल्यानंतर एका बाउल मध्ये हि तयार उसळ त्यावर बारीक चिरलेला कांदा, लिंबू , आणि फरसाण घालून पावाबरोबर खाण्यास घ्यावे  
८. आवडत असल्यास मिसळीवर चमचाभर दही टाकून घेऊ शकतो, तेही खूप छान लागते 

टीप : यात सर्व प्रकारचे मोड एकत्र वापरू शकतो 
      फरसाण ऐवजी चिवडा वापरू शकतो ( पण कोल्हापुरी मिसळ मध्ये फरसाणच वापरतात :-))