Sunday 14 June 2015

Corn Rice - स्वीट कॉर्न पुलाव

Corn Rice - स्वीट कॉर्न पुलाव 

अगदी नैवेद्याला हि चालणारी… मस्त आणि नेहमीच्या मसालेभाताला छान पर्याय आहे हि रेसिपी …. यात आवडी प्रमाणे भाज्या घालू शकता पण दिलेल्या भाज्या सर्वात छान लागतात … 

साहित्य :

२ वाट्या तांदूळ 
सोललेले स्वीट कॉर्न पाऊण वाटी 
१ लहान सिमला मिरची 
१ टोमाटो 
१ मध्यम आकाराचा बटाटा 
तेल 
पुलाव किंवा बिर्याणी मसाला किंवा आवडत असेल तर खडा मसाला 
फोडणीचे साहित्य 
मीठ 
तिखट 
पाणी 

कृती :

१. तांदूळ धुवून १ तासासाठी भिजवावेत,  पाणी काढून , त्यात १ चमचा पुलाव मसाला, गरजेप्रमाणे मीठ, तिखट घालून मिक्स करून ठेवावे. 

२.  टोमाटो व सिमला मिरची  धुवून लांबट आकारात कापून घ्याव्यात , बटाटा साल काढून लांबट आकारात कापावेत फार बारीक कापू नये 

३. पातेल्यात किंवा कुकर मध्ये तेल गरम करून त्यात थोडे जिरे , हळद, हिंग घालावी, त्यावर चिरलेल्या भाज्या घालाव्यात व थोड्या परताव्यात. त्यावर भिजवलेले  तांदूळ घालावेत आणि नीट परतावे. 

४. तांदुळाच्या दुप्पट पाणी घालावे व कुकरचे झाकण लावून २-३ शिट्या काढाव्यात , पातेल्यात असल्यास अर्धवट झाकण ठेऊन लक्ष द्यावे म्हणजे कढ उतू जाणार नाही. हे मिश्रण सारखे हलवू नये तांदुळाची शिते तुटतात. गरज लागल्यास काटा चमच्याने हलवावे. 

५. शिजल्यावर गरम गरम सर्व्ह करावा त्यावर कोथिम्बिर आणि खोबरे घालून….  

Saturday 13 June 2015

अळिवाचे / हळिवाचे लाडु

खरतर या लाडवाची कृती पोस्टायला वेळ झाला … उन्हाळा आला आता पण तरीही आता वेळ आहे थोडा म्हणून आत्ता देती आहे … कृपया गोड मानून घ्या… 

साहित्य :-
१/३ वाटी स्वच्छ निवडलेले अळीव 
एक नारळ खोवलेला
दिड वाटी गुळ
२ चमचे तूप 
५-६ भिजउन साल काढलेले बदाम
आवडत असल्यास वेलची पावडर

कृती :-
अळीव स्वच्छ निवडुन घ्यावेत. त्यामधे बारिक खर असते. 
खाताना तोंडात आली तर लाडु खावासा वाटत नाही. 

१) नारळ पाण्यामध्ये अळिव किमान २ तास भिजउन ठेवावेत, जर पुरेसे नारळ पाणी नसेल तर साद्या पाण्यात किंवा दुधात भिजवावेत. 

२) अळीव नीट भिजल्यावर एका कढईत २ चमचे तुप वितळउन त्यावर चिरलेला गुळ  दिड वाटी घालावा. सतत हलवत रहावे.

३) गुळाला बुडबुडे आल्यावर एक खोवलेला ओला नारळ घालावा. खोबर्याची पाठ येऊ देऊ नये.  चांगले परतुन घ्यावे. 

४) आता त्यात भिजवलेले अळीव घालावे. बदामाचे तुकडे घालावे. अळीव ओले असल्यामुळे हे मिश्रण पातळ होईल. सतत हलवत रहावे.आच बारीकच ठेवावी. जवळ जवळ अर्ध्या तासात हळुहळु हे मिश्रण आळुन येईल. शिर्यापेक्षा थोडे आळले की बंद करावे. गार झाल्यावर लाडु वळावेत. 

 हे लाडु थोडे मऊसरच होतात. 
दिलेल्या साहित्यात १० लाडु होतील. 
४-५ दिवस शीतकपाटाबाहेर राहतात… 
बाळंतिणीला उत्तम आहेत, दुध वाढायला मदत होते. 
प्रकृतीने उष्ण आहेत . 

Pumkin Pancakes- Bhopalyache Thalipit

भोपळ्याचे थालीपीठ

वन फुल मिल….  बेष्ट रेसिपी आहे …क़धिहि ट्राय करा चुकत नाही … पोट भर आणि खमंग

साहित्य :-

२ वाटी लाल भोपळ्याचा खीस
२ चमचे बेसन
१ चमचा तांदूळ पिठी
१ चमचा कणिक
गरजेप्रमाणे ज्वारीचे  पीठ ( भाकरी चे )
१/२ चमचा आले लसुन कोथिम्बिर पेस्ट
मीठ
तिखट
तेल

  कृती :

१. एका मोठ्या ताटात भोपळ्याचा खीस, तिखट आले लसूण पेस्ट,  मीठ, अर्धा चमचा साखर घेवून एकत्र करावे, त्यात हळू हळू  सर्व पीठे मिक्स करावीत थोडासा पाण्याचा हात लावावा, भाकरीला मळतो त्यापेक्षा पीठ थोडे पातळ करावे

२. तवा नीट तापवून घ्यावा , पोळपाटावर एक कापड भिजवून घ्यावे त्यावर मळलेल्या पिठाचा गोळा ठेवून थापावा आणि त्याला मध्यभागी आणि त्याभोवातली बोटाने छिद्रे पाडावीत. 

३. तापलेल्या तव्यावर तेल लावून अलवार हाताने हे थालीपीठ टाकावे , झाकण ठेवावे , झाकणावर ४ थेंब पाणी घालावे आणि नीट  वाफ काढावी , पाणी उडून गेल्यावर झाकण काढून थालीपीठ दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावे

४. घरगुती चटण्या , लोणी , सॉस या सर्वाबरोबर हे थालीपीठ उत्तम लागते.  

Tuesday 9 June 2015

Soya Chunks Poha - सोया चंक्स पोहे

सोया चंक्स पोहे

हि रेसिपी तुम्ही नाश्ताला ट्राय करू शकता, बर्याचदा घरी सोया चंक्स आवडीने खाल्ले जात नाहीत. या रेसिपीत सोय चंक्स खुप छान लागतात आणि आवडीने खाल्ले जातात

साहित्य :
अर्धी वाटी भिजवलेले सोया चंक्स
२ वाटी जाड पोहे
तेल
१ कांदा
१ छोटा टोमाटो
२ मिरच्या
कोथिम्बिर
कढीपत्ता
फोडणीचे साहित्य
मीठ
साखर चवीनुसार

कृती :

१. सोय चंक्स ४ तास भिजवून ठेवावेत . कांदा आणि टोमाटो बारीक चिरून घ्यावा मिरचीचे एक इंचाचे तुकडे करावेत, पोहे चाळणीत भिजवावेत, त्यावर चवीनुसार मीठ आणि साखर घालून ठेवावी

२. कढईत तेल घालून, मोहरी, हळद, हिंग कढीपत्ता घालून फोडणी करावी, कांदा आणि टोमाटो घालावा व  थोडा परतावा, त्यावर  भिजवलेले सोया चंक्स घालून, परतून छान वाफ काढावी. चंक्स वाफवले गेले आहेत याची खात्री करावी

३. त्यावर भिजवलेले पोहे घालून, परतून, झाकण ठेवून निट वाफ काढावी. तयार झाल्यावर कोथिम्बिर घालून सर्व्ह करावे.

टीप : सोया चंक्स आधी वाफवून घेऊ शकता, या पोह्यात कोबी घातल्यास छान लागतो