Saturday 14 March 2015

Puranpoli - पुरणपोळी

पुरणाच्या पोळ्या

लागणारा वेळ : १. ५ तास
पुरणपोळी 

साहित्य:

१ वाटी हरभरा डाळ (२-३ तास पाण्यात भिजवलेली)
१ वाटी गुळ
१ चमचा भाजलेल्या बडीशेपेची भरड
१ चमचा छोटा वेलची पावडर
२ वाटी  गव्हाचे पीठ
१ वाटी तांदळाचे पीठ ( असल्यास)
३ चमचे तेल
चवीनुसार मीठ
मळण्यासाठी पाणी
साजूक तूप

कृती :

१. हरभरा डाळ कुकरला लावून ४-५ शिट्या काढून घ्याव्यात , डाळ पूर्ण मऊ शिजली पाहिजे .

२. कुकर गार होईपर्यंत कणिकेत थोडे मीठ आणि तेल घालून मळावे, कणिकेला चांगले १५-२० मिनिटे पाण्याचा हात लाऊन मळत राहावे. मध्ये मध्ये कणकेचा थोडा तुकडा हातात घेऊन तो दोन बाजूने ओढून पाहावा, तो व्यवस्थित लांब होत असेल व लगेच तुटत नसेल तर कणिक मळून झाली असे समजावे. त्यावर तेलाचा हात फिरऊन गोळा  झाकून ठेवावा.

३. कुकर मधील डाळीतील पाणी आणि थोडी शिजलेली डाळ बाजूला काढावी, याची कटाची आमटी करतात
जर आमटी नको असेल तर फक्त पाणी काढावे. यामध्ये गुळ घालून परत शिजवायला ठेवावे, हे पुरण सतत हलवत राहावे नाहीतर तळाला लागते. पुरण तयार होत आले कि ते भांड्याच्या कडा सोडून गोळा होईन येऊ लागते, आणि हाताला हलवण्यास जड येते. पुरण घट्टसर करून घ्यावे.

४. खाली उतरउन त्यात वेलची पावडर आणि बडीशेपेची भरड घालावी, आणि गरमच पुरणयंत्रावरून   फिरवून घ्यावे , जर पुरण यंत्र नसेल तर हल्ली जाळ्या मिळतात त्यावरून जरी गाळून घेतले तरी चालेल

५. पुरण गार झाले कि त्याचे गोळे करून घ्यावेत, तवा तापत ठेवावा, उलथने जवळ ठेवावे. आता मळलेल्या कणीकेचा  पुरणाच्या गोळ्याच्या निम्मा किंवा थोडा कमीच गोळा घ्यावा , त्याला हातावर खोलगट आकार देऊन त्यात पुरणाचा गोळा ठेवावा, आणि कणिकेचे तोंड हळूहळू मिटुन घ्यावे ( हे काम अतिशय काळजीपूर्वक करावे) तयार गोळा हळू हळू चपटा करून तांदळाच्या पिठात घोळऊन पोळपाटावर अगदी हलक्या हाताने लाटावा. लाटताना पोळीच्या कडे पर्यंत पुरण जाईल याची काळजी घ्यावी.

६. तयार पोळी हळुवार हाताने तव्यावर टाकावी ( अवघड वाटत असल्यास एका पुरेशा मोठ्या कागदाचा तुकडा प्रथम पोळीवर झाकावा नंतर पोळपाट उचलून पोळी कागदावर घेऊन मग तव्यावर टाकावी.

७. मध्यम आचेवर पोळी दोन्ही बाजूने नीट खरपूस भाजून घ्यावी , परताना पोळी मोडणार नाही याची काळजी घावी.

८. तव्यावरून काढून गरम गरम असताना तुपाची धार सोडून खावे.

या साहित्यात ८-१० पोळ्या होतील.   

No comments:

Post a Comment